रत्नागिरी, १४ जून २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक आणि कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, देवरूख पोलिसांनी काल रात्री गोवंश तस्करीचा एक मोठा प्रकार उघडकीस आणला.
गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस:
दिनांक १३ जून २०२५ रोजी रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास, देवरूख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरपा पोलीस दूरक्षेत्रांतर्गत मूर्शि चेकपोस्ट येथे नियमित गस्तीवर असताना, देवरुख पोलीस पथकाला MH-08-M-4929 क्रमांकाची एक संशयित बोलेरो पिकअप गाडी येताना दिसली. पोलिसांनी त्वरित ही गाडी थांबवून तिची तपासणी केली असता, गाडीच्या हौद्यात दोन बैल अत्यंत अमानुषपणे, जवळजवळ बांधलेले आढळले. त्यांना हालचाल करता येऊ नये आणि वेदना होतील अशा प्रकारे आखूड दोरीने मानेला बांधले होते. गाडीचा हौदा चारही बाजूंनी ताडपत्रीने बंदिस्त केला होता, तसेच गुरांना दुखापत होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी कोणतेही विभाजन केले नव्हते. विशेष म्हणजे, गुरांची कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नव्हती आणि गुरे खरेदी-विक्रीचा किंवा वाहतुकीचा परवानाही नव्हता.
गुन्हा दाखल आणि आरोपींवर कारवाई:
पोलिसांनी गाडीवरील चालक सागर नामदेव पाटील (वय ३१, रा. पिशवी, केळेवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याची चौकशी केली असता, ही दोन्ही गुरे कत्तल करण्याच्या उद्देशाने, गैरकायदा आणि बिगर परवाना अवैधपणे वाहतूक करून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. सध्या गाडीचा वापर करणारा आरोपी प्रदीप अरुण लाटवडेकर (रा. पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि बैलांचा मालक आरोपी नागेश कदम (रा. देवरुख, बौद्ध वाडी) यांच्या सांगण्यावरून ही वाहतूक केली जात होती.
या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२५ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ (अ), ५ (ब) व ९ सह, प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (घ), (ङ), (च) सह, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ सह, मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ६६/१९२, ३/१८१, प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ चे कलम ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५४, ५६ आणि भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सागर नामदेव पाटील याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. तसेच, आरोपी प्रदीप अरुण लाटवडेकर आणि नागेश कदम यांच्यावरही देवरूख पोलीस ठाण्यातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आरोपी नागेश कदम याच्यावर यापूर्वीही देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०३/२०२४ अन्वये बी.एन.एस. २०२३ चे कलम १०९, ११८ (१), ११५(२), ३५२, ३५१, ३३३, १८९(२), १८९ (४), १९० अन्वये गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
या कारवाईत पोलिसांनी एकूण ३,७३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
३,५०,०००/- रुपये किमतीची एक सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी.
१३,०००/- रुपये किमतीचा एक बैल.
१०,०००/- रुपये किमतीचा एक बैल. जप्त केलेल्या दोन्ही गोवंश बैलांची सुटका करण्यात आली आहे.
यशस्वी कामगिरी:
ही महत्त्वपूर्ण कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर आणि त्यांची टीम, ज्यात पो.उ.नि. श्री. नामदेव जाधव, पो. हवा/१०२७ श्री. नितीन जाधव, पो. हवा/१५५१ श्री. संजय करांडे, पो. कॉ/१६०७ श्री. सुहास लाड, पो. कॉ/५५६ श्री. तानाजी पाटील आणि पो. कॉ/१३५९ श्री. तुळसणकर (पोलीस मुख्यालय रत्नागिरी) यांचा समावेश आहे, यांनी पार पाडली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून, गोवंश तस्करी आणि कत्तलीच्या विरोधात रत्नागिरी पोलीस दल सक्रियपणे कारवाई करत असल्याचे या घटनेतून दिसून येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 14-06-2025














