रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दुचाकीस्वारावर पोलिसांकडून कारवाई होते. मात्र, वडाप, चारचाकी, रिक्षा, एसटीच्या चालक कित्येक वेळा मोबाईल फोनवर बोलत असतात, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशा बेशिस्त चालकांवर चाप बसवण्यासाठी दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे, तरच वाहनधारकांना शिस्त लागेल. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मागील दीड वर्षात 488 वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 58 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा तसा पर्यटनाचा जिल्हा आहे. यामुळे जिल्हा नेहमी गजबजलेला असतो. त्याचबरोबर कामानिमित्त तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक रत्नागिरीत येत असतात. काहीजण दुचाकी, चारचाकीत येतात. काहीजण वेगात गाडी चालवत खुशाल मोबाईलवर बोलत असतात. अशा वेळी दुचाकीस्वारांवर कारवाई होते मग चारचाकी, रिक्षा चालकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. एसटी बसेसमधूनही दररोज हजारो प्रवासी लांजा, राजापूर, साखरपा, चिपळूण, दापोली, मंडणगड याचबरोबर मुंबई, पुणे, सोलापूर असा लांबचा प्रवास करत असतात.य ातील चालक फोन आल्यास बोलतो काहीजण तर रिल्स पाहत गाडी चालवत असल्याचा प्रकार सर्रास सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग व शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षा, वडाप आणि एसटी चालाकांचे वाहन चालवताना वाढत जाणारे मोबाईलवर बोलणे सुरू असते. अशा चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास 1 हजार दंड किंवा 3 महिने लायसेन्स रद्द अशी कारवाईची तरतूद आहे. वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास 5 हजारांचा दंड आहे. ट्रिपलसीट प्रवास 1 हजार रुपये असा दंड असला तरी वाहनधारकाकडून नियमांचे पालन होत नाही. दुचाकीवर सर्रास कारवाई होत असते मात्र चारचाकी, वडाप, एसटी चालकावर कारवाई का होत नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे इतर वाहनकावर ही कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मोबाईलवर बोलत वाहन चालवणार्या वाहनधारकांची तपासणी करून दोषी आढळल्यास कारवाई होते. मागील दीड वर्षात 488 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, तर त्यांच्याकडून 2 लाख 58 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, अन्यथा कारवाई केली जाईल. – राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:39 14-06-2025











