रत्नागिरी : महाराष्ट्रात ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आयोजित ‘सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा’ आता रत्नागिरीत दाखल होत असून, रत्नागिरीतील जनतेला मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या पवित्र दर्शनाचा सुवर्णयोग मिळणार आहे. अकराव्या शतकात मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या आक्रमणात पवित्र शिवलिंगाचे तुकडे झाले होते. त्यावेळी अग्निहोत्रींनी यापैकी काही अवशेष जपून ठेवले आणि त्यांना शिवलिंगाचा आकार देऊन त्यांची पूजा केली. हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले होते.
१९२४ साली कांचीचे परमचार्य यांनी केलेल्या भाकीतानुसार, १०० वर्षांनी बंगळूरुमधील संत येतील आणि त्यांना हे अवशेष सुपूर्द केले जातील. त्यानुसार, हे पवित्र शिवलिंग गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या बंगळूरु आश्रमात सुपूर्द करण्यात आले. आता याच मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आयोजित या यात्रेद्वारे जनतेसमोर आणले जात आहेत. हे अवशेष भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य भाग आहेत.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या इच्छेनुसार आणि सर्व समाजाला या पवित्र अवशेषांचे दर्शन घडावे या उद्देशाने त्यांचे अनुयायी भारतातील विविध भागांमध्ये हे ज्योतिर्लिंग घेऊन जात आहेत. तळकोकणातून सुरू झालेली ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात, विशेषतः रत्नागिरी शहरात येत आहे, हे रत्नागिरीकरांचे भाग्यच म्हणावे लागेल.
दर्शनाचे वेळापत्रक:
- बुधवार, १८ जून २०२५:
- रुद्र पूजा आणि दर्शन सोहळा: सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत
- स्थळ: अंबर हॉल, टीआरपी, रत्नागिरी
- गुरुवार, १९ जून २०२५:
- दर्शन सोहळा: सायंकाळी ६.०० ते ८.३० वाजेपर्यंत
- स्थळ: मराठा मंडळ हॉल, जिल्हा परिषद जवळ, माळनाका, रत्नागिरी
वेदिक धर्म संस्थान आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंग, रत्नागिरीतर्फे रत्नागिरीतील सर्व भाविकांना या पवित्र दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग बनून आध्यात्मिक ऊर्जा आणि शांतीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.














