चिपळूण : तनाळी राधाकृष्णवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

चिपळूण : तालुक्यातील तनाळी राधाकृष्णवाडी येथील सहदेव धोंडू बाईत यांच्या घरामागील विहिरीत रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडलेला आढळून आला. याबाबत सनवी सूरज बाईत यांनी माहिती देताच पोलिसपाटील राजेश थरवळ यांनी तातडीने चिपळूण वन विभागाचे अधिकारी एस. एस. सावंत यांना कळविले.

वन परिमंडल अधिकारी सावंत यांनी तातडीने फिरत्या पथकाला माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन बिबट्याला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढले. वन विभागाच्या रामपूर परिक्षेत्रामध्ये तालुक्यातील तनाळी राधाकृष्णवाडी येथील विहिरीत पडलेल्या सुमारे दोन ते अडीच वर्षे वयाच्या मादी जातीच्या बिबट्याला वन विभागाच्या फिरत्या पथकाने विहिरीतून बाहेर काढून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सहदेव बाईत यांच्या घरामागील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळाली. यानंतर फिरत्या पथकातील जी. एम. पाटील, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, रामपूर वनरक्षक राहूल गुंठे, अनंत मंत्रे, वाहनचालक नंदकुमार कदम, संजय आंबोकर आदींनी बचाव पथक व साहित्य घेऊन घटनास्थळी जात काही वेळेतच विहिरीतील बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कणसे यांनी बिबट्याची पाहणी केल्यानंतर तो सुस्थितीत असल्याची खात्री दिली. यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्यासह विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक एस. एस. खान आदींनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 16/Jun/2025