गुहागर : मुसळधार पावसाने पालशेत बाजारपेठेमध्ये अक्षरशः हाहाकार उडवला. शुक्रवारी १३ दुपारपासून सुरू झालेल्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले. यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
पालशेतसह मारुती मंदिर बाजारपेठेत आणि वस्तीमध्ये, घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांची धावपळ उडाली. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या भागामध्ये राहत्या घराजवळ दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नद्या, नाले, ओढ्यांना आलेले पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. दगड, मातीचा थर रस्त्यावर आला आणि वाहतूक ठप्प झाली.
जेसीबीच्या सहाय्याने येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दगड-माती हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या मुसळधार पावसाचा फटका पालशेतच्या चारही महसुली गावांना बसला असून अनेक व्यावसायिकांच्या, शेतकरी बागायतदारांच्या वस्तू, शेतीची अवजारे पुरामध्ये वाहून गेली. तसेच पंप पाण्याखाली गेले. यामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 16/Jun/2025














