थिबा राजाकालीन बुद्धविहाराच्या संरक्षणासाठी ‘संघर्ष समिती’ स्थापन : रत्नागिरीतील बौद्ध समाज एकवटला!

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील ऐतिहासिक थिबा राजाकालीन बुद्धविहाराच्या जागेवरील आरक्षण उठवून तिथे कम्युनिटी सेंटर उभारण्याच्या शासकीय निर्णयाविरोधात बौद्ध समाजाने एल्गार पुकारला आहे. या लढ्याला आता संघटित स्वरूप प्राप्त झाले असून, शनिवारी (१४ जून २०२५) आयोजित बौद्ध समाजाच्या सर्व धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संस्थांच्या संयुक्त बैठकीत एकमताने ‘थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती’ ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, मा. एल. व्ही. पवार साहेब यांची बहुमताने निवड करण्यात आली.

थिबा राजाकालीन बुद्धविहाराचा प्रश्न हा संपूर्ण बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने, या ऐतिहासिक लढ्यात न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरची लढाई देखील करावी लागणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. संघर्ष समितीचे अध्यक्ष मा. एल. व्ही. पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष म्हणून आयु. अनंत सावंत गुरुजी यांची निवड करण्यात आली. तसेच, उपाध्यक्षपदी आयु. प्रकाश यशवंत पवार (पावस विभाग बौद्ध विकास संघ), आयु. अनिल जाधव, आयु. किशोर पवार तर सचिवपदी आयु. अमोल जाधव यांची निवड झाली. सहसचिव म्हणून आयु. मुकुंद सावंत, तुषार जाधव आणि खजिनदार म्हणून आयु. नरेन आयरे यांची निवड करण्यात आली.

या समितीला मार्गदर्शन करण्यासाठी आयु. दीपक सीताराम जाधव, आयु. संजय आयरे, आयु. शिवराम कदम, आयु. रत्नदीप कांबळे, आयु. राजेंद्र कांबळे, आयु. राहुल पवार, आयु. प्रदीप पवार, आयु. सुनील आंबुलकर, आयु. बी. के. कांबळे आदींची सल्लागार म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली.

या महत्त्वाच्या सभेला रत्नागिरी तालुक्यातील सुमारे ५६ गावांमधील प्रतिनिधी उपस्थित होते, त्यापैकी ३९ प्रतिनिधींची कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सभेला उपस्थित असलेल्या सर्व बंधू-भगिनींना संघर्ष समितीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. येत्या काही दिवसांत रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध बंधू-भगिनींची एक भव्य सभा आयोजित करून, संपूर्ण तालुक्यातील सर्व गावांचे प्रतिनिधी या संघर्ष समितीमध्ये समाविष्ट करून हा लढा अधिक व्यापक केला जाईल, असे संघर्ष समितीच्या कार्यकारिणीकडून सांगण्यात आले.

या ऐतिहासिक लढ्यामध्ये संपूर्ण समाज एकत्र आला असून, आता प्रत्येक पावलावर समाज संघर्ष समितीच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील, अशी ग्वाही उपस्थित बंधू आणि भगिनींनी दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष मा. एल. व्ही. पवार साहेब यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “आपण या संघर्ष समितीमध्ये एकत्र आलो आहोत ते समाज म्हणून, आपल्या संघटना आणि पक्ष बाजूला ठेवून, तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून समाजाला एकत्र करून हा लढा यशस्वी करूया.” रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष समिती स्थापन झाल्यामुळे बौद्ध समाजात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून संघर्ष समितीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 16-06-2025