रत्नागिरी : एडीप व वयोश्री या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सोमवारी, दि. 16 जून रोजी साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
रत्नागिरीत कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सकाळी 11 वाजता साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या वितरण शिबिराचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी आपले साहित्य स्वीकारण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि पालकमंत्री श्री. सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
एडीप व वयोश्री या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरांचे 24 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांग तसेच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना वेळापत्रकानुसार होणाऱ्या शिबिरात साहित्य वितरण होणार आहे. लाभार्थींनी साहित्य स्वीकारण्यासाठी येताना तपासणी दरम्यान त्यांना मिळालेली पावती व आपले आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यातील वितरण शिबिरांचे वेळापत्रक तालुकानिहाय असे – रत्नागिरी तालुका – दि. 16 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव. राजापूर तालुका – दि. 18 जून रोजी सकाळी 10 ते 4 – आबासाहेब मराठे कॉलेज, हातिवले, राजापूर. लांजा तालुका – दि. 17 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 – न्यू इंग्लिश स्कूल, लांजा. संगमेश्वर तालुका – दि. 19 जून रोजी सकाळी 10 ते 4 – छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, देवरूख. चिपळूण तालुका – दि. 20 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 – ग्रामीण रुग्णालय कामथे, चिपळूण. गुहागर तालुका – दि. 21 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 – पंचायत समिती, गुहागर. दापोली तालुका – दि. 23 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती दापोली. मंडणगड तालुका – दि. 24 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मंडणगड. खेड तालुका – दि. 25 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 – सभापती निवासस्थान, पंचायत समिती, खेड.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 16-06-2025














