गुहागर : गुहागर तालुक्यातील काही गावांना शनिवारी दुपारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पालशेतमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येऊन भरवस्तीत तसेच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. यावेळी गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांनी तत्काळ भेट दिली. तालुक्यातील तवसाळ येथे केबल टाकण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने मुसळधार पावसामुळे एका ठिकाणचा रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय होणार आहे.
शनिवारपासून गुहागर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आरे येथे रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर रोहिले ब्रिज ते तवसाळ रस्ता येथे एअरटेल व महावितरण यांच्या खोदाईमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन रस्ताच वाहून गेला आहे.
असगोली मधली वाडी येथे प्रदीप घुमे यांच्या घरासमोरील दगडी बांध कोसळला आहे. नरवण ग्रामपंचायत रोडवर झाड पडून एलटी वायर तुटल्या. कुडली येथे दिलीप ठोंबरे यांच्या घरावर आंबा कलमाचे झाड पडून पत्र्याचे नुकसान झाले. अडूर चिखलगाव येथे संरक्षक भिंत कोसळून शेतीमधून पाणी जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कोंडकारूळ येथे सावित्री मोरे यांच्या जुन्या घराची भिंत लगतच्या धनंजय मोरे यांच्या घराच्या भिंतीवर कोसळून घराच्या भिंतीचे व खिडकीचे नुकसान झाले आहे. तवसाळ खुर्द येथील जयेश गडदे यांच्या घराजवळचा बांध पावसाने खचला तर साखरी आगर धरण वाडी येथे अभिजित माईन यांच्या घराशेजारी दरड पडली. मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 16/Jun/2025














