मंडणगड : सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह तुळशी घाट येथे विविध समस्या निर्माण झाल्याने महसूल व नगरपंचायत प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. झालेल्या मुसळधार पावसात शहरातील परिवार पार्क येथे महामार्गाला गटार व्यवस्था न केल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले व याच मार्गावर दरीकडील बाजूस असलेल्या घरांच्या पडवीमध्ये पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे नुकसान झाले आहे. तुळशी घाटात महामार्गावर केबल जोडणीचे काम सुरु असल्याने रस्त्यावर पाणी साचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली, तर पाचरळ गावानजीक नवीन पुलाला पर्यायी असलेला मार्ग खचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती.
जून महिन्यात काहीशी विश्रांती घेणारा मान्सून दुसऱ्या आठवड्यात चांगलाच सक्रिय झालेला दिसून आला आहे. रविवारी तालुक्यात १७७मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. शहरातील परिवार पार्कनजीक येथील रस्त्यावर आलेले पाणी थेट येथील नागरिकांच्या घरात घुसले. याठिकाणी या घरात अडचणी निर्माण होऊ नयेत याकरिता नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळीही युद्धपातळीवर काम करुन सहकार्य केले.
दरम्यान, महामार्गावर सर्वच अडचणीचे ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याचे दिसून आले. पाचरळ, तुळशी, पाले या ठिकाणांसह मोऱ्यांची व पुलाची कामे सुरु असलेल्या सर्व ठिकाणी पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात न घेता कामे अर्धवट सोडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे दुचाकी व तीनचाकी वाहने पाण्यात अडकल्याने नागरिकांचे नुकसान झाले. महामार्ग प्राधिकरणाने अर्धवट कामामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीचा विचार केलेला नाही, त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला अडचणींचे सत्र सुरु झाले आहे.
सर्व विभागावर नियंत्रण ठेवणाऱ्या महसूल विभागाचेही पुर्वतयारीकडे काहीसे दुर्लक्ष झालेले दिसून आले आहे व तुळशी घाटात दरड पडण्याचे सत्र सुरु झाल्यास आगामी काळात प्रशासनाच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्रभर पडलेल्या धुर्वाधार पावसामुळे तालुक्यातील चिंचघर येथे संतोष भिकू पिंपळकर यांच्या घराचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फांदी पडून ९ हजारांचे नुकसान झाले. केळवत येथे सागर भोगले यांची पोल्ट्रीची शेड पावसामुळे कोसळून ७० हजाराचे नुकसान झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 16/Jun/2025














