संगमेश्वर : तालुक्यात शुक्रवारी (ता. १३) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील भाजीमार्केट, मच्छीमार्केट आणि बसस्थानकाच्या काही भागांमध्ये चिखल पसरला. यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
व्यापारीसंघाचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद भिंगार्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या संगमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच कामामुळे निर्माण झालेल्या समस्या आता समोर येत आहेत. संगमेश्वर बाजारपेठेकडे जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या सेवारस्त्यास गटारांची कोणतीही सोय नाही. परिणामी, पावसाचे पाणी आणि डोंगर कापल्यामुळे आलेली माती थेट बाजारपेठेत शिरत आहे. भाजीमार्केट आणि मच्छीमार्केटसह काही भागांमध्ये गुडघ्यापर्यंत चिखल साचल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर चालण्यासाठी नागरिकांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका नागरिकाच्या घरात चिखल आणि पाणी शिरल्याने त्यांना रात्र जागून काढावी लागली तसेच त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
संगमेश्वर परिसरात चिखलाचा थर साचला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या चिखलातून मार्ग काढताना खूप कसरत करावी लागते आहे. बसस्थानकावरील चिखल आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग नियमित व्हावा, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 16/Jun/2025














