चिपळूण : कालुस्ते-भिले खारभूमीसाठी ३ कोटी २१ लाख मंजूर

चिपळूण : दाभोळ खाडीसह वाशिष्ठी नदीच्या उजव्या तीरावरील कालुस्ते-भिले खारभूमी योजनेच्या नूतनीकरणासाठी ३ कोटी २१ लाखांच्या अंदाजपत्रकास शुक्रवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या नूतनीकरणासाठी कालुस्ते, भिले गावातील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांना साकडे घातले होते. अखेर ही योजना मार्गी लागल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी आमदार निकम यांना धन्यवाद दिले.

जिल्ह्यात जलसंपदा या अखत्यारित असलेल्या १७० खारभूमी योजनेत या योजनेचा समावेश आहे. या योजनेतील बांधकामास २५ वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे; मात्र अलिकडे सातत्याने होणारी अतिवृष्टी, चक्रिवादळ, सततच्या येणाऱ्या पुरामुळे बांधाची धूप होऊन बांध कमकुवत झाला आहे. अनेक ठिकाणी तो वाहून तर काही ठिकाणी तो दबला गेला आहे. परिणामी, बांधाची उंची कमी झालेली आहे २०२१ मधील महापुरात अनेक ठिकाणा बांधावरून पाणी गेल्याने व लगतच्या खाडीमधून बऱ्याच प्रमाणात वाळू उपसा झाल्याने दगडी पिचिंग वाहून गेल्याने बांधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकूणच दोन्ही गावातील परिसरातील विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या योजनेमुळे दोनशेहून अधिक हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. हे क्षेत्र लागवडीखाली येणे शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्वाचे होते. त्यासाठी कालुस्ते ग्रामस्थांनी या योजनेच्या नूतनीकरणासाठी आमदार निकम यांना साकडे घातले होते. त्यानुसार निकम यांनीही सातत्याने प्रयत्न केले. अखेर शुक्रवारी ३ कोटी २१ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी मान्य झाल्याने ग्रामस्थांनी आमदार निकमांचे आभार मानले.

कालुस्ते आणि भिडे व दाभोळ खाडी व वाशिष्ठी नदीला लागून आहेत. तेथील दोन्ही खारभूमी योजना नादुरूस्त झाल्यामुळे पावसाळ्ळ्यात था परिसरातील शेती पाण्याखाली जात होती. वर्षभरापूर्वी भिले-जाभुळवाडी योजनेला ९२ लाखाचा निधी मंजूर करून ती मार्गी लागली. आता कालुस्त-भिले ही योजनाही मार्गी लागल्यामुळे दोन्ही गावांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. – शेखर निकम, आमदार, चिपळूण-संगमेश्वर मतदार संघ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 14/Oct/2024