पावस : कुर्धे नदीवरील लोखंडी साकव बनलाय धोकादायक

पावस : तालुक्यातील कुर्धे नदीवरील धोकादायक लोखंडी साकवाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असली तरी पावसाळ्यामध्ये सततच्या वाहतुकीने तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार, नदीच्या दोन्ही भागांतील नागरिकांचा पावसाळ्यामध्ये तुटलेला संपर्क जोडता यावा या दृष्टिकोनातून साकव कार्यक्रमांतर्गत या नदीवर तो लोखंडी साकव बांधण्यात आला होता.

या साकवाची ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर दोनवेळा दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. मागील वर्षों या साकवाचा पहिल्याच पावसात धोका निर्माण झाल्यामुळे त्या वेळी रत्नागिरी तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी आणि पोलिस यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तात्पुरती साकवाची दुरुस्ती केली आणि पावसाळ्यानंतर या साकवाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु दुसरा पावसाळा आला तरी त्याकडे प्रशासनाने दखल घेतली नाही. त्या वेळी काही स्थानिक ग्रामस्थांनी भेट घेऊन परिस्थिती समजावून सांगितली.

त्या वेळी तुम्ही मागणी अर्ज द्या म्हणजे आम्ही दुरुस्तीचे काम हाती घेऊ, असे सांगण्यात आले; परंतु त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली असताना अखेर तहसीलदार मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली पुन्हा एकदा पावसाळ्यामुळे दुरुस्ती करता येणार नाही तेव्हा तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आहे, त्यामुळे या परिसरात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे ही तात्पुरती दुरुस्ती किती काळ टिकणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या साकवाच्या माध्यमातून या परिसरातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे भवितव्य अवलंबून आहे.

आम्ही वारंवार ग्रामपंचायत व तहसीलदार यांना या ठिकाणच्या परिस्थितीबाबत सांगितले आहे; परंतु या परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका आहे तरीही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही-अनंत अभ्यंकर, ग्रामस्थ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 16/Jun/2025