राजापुरात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू

राजापूर : तालुक्यामध्ये रात्री पडलेल्या मुसळधार पावसामध्ये कोदवली नदीमध्ये अचानक वाढ होऊन पाण्याने थेट जवाहर चौकातील टपऱ्यांना वेढा घातला होता. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला; मात्र, सुमारे तासाभरानंतर नदीचे वाढलेले पाणी कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी निःश्वास सोडला.

मुसळधार पडलेल्या पावसामध्ये रात्री अचानक कोदवली नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागली. पाण्याने जवाहरचौकातील कोदवली नदीच्या काठावरील टपऱ्यांना धडक दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तासाभराने पाणी ओसरले.

तालुक्यात शुक्रवारी झालेल्या पावसाने थोडी उंसत घेतल्यानंतर महसूल विभागाने पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात देवाचेगोठणे, नवेदर, आडिवरे, भालावली, वेत्ये, नाटे, राजवाडी आदी गावांतील घरांमध्ये मध्यरात्री पाणी घुसले होते. धाऊलवल्ली, देवाचेगोठणे, राजवाडी येथे साकव वाहून जाऊन रस्त्यावर दरडी कोसळून अन् रस्ता खचून काही वाड्यांमधील लोकांचा संपर्क तुटला आहे. सोलगाव येथे वहाळाचे पाणी घुसून बागायतींचे नुकसान झाले आहे.

त्यामध्ये देवाचेगोठणे कातळीवाडी येथील साकव वाहून जाताना सुधीर शिरसाट, महेश करंगुटकर, रमेश नारकर, चारुदत्त करंगुटकर आदींच्या घरामध्ये नजीकच्या वहाळ आणि खाडीचे वाढलेले पाणी घुसले होते. वेत्ये येथे नजीकच्या खाडीचे वाढलेले पाणी लगतच्या काही घरांमध्ये घुसले होते. धाऊलवल्ली भाटलेवाडी येथील पूल वाहून गेला असून, येथील आंबेलकरवाडी, जोगवाडी येथे घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. राजवाडी-कांगापूर येथे घरांची पडझड होताना येथील पुलाचा निम्मा भाग वाहून गेला आहे. देवाचेगोठणे-सोलगाव रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नवेदर येथेही घरामध्ये पुराचे पाणी घुसले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 16/Jun/2025