मंडणगड : मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रात पाच हजार वृक्षांची लागवड तसेच त्या झाडांचे लक्ष नगरपंचायतीने यंदा निर्धारित केले आहे. मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची सुरुवातही झाली आहे. वृक्षतोडीमुळे तापमानवाढीसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे, ही बाब लक्षात घेऊन मोहिमेत शहरातील स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, महिला बचतगट, ग्रामस्थ मंडळ व नागरिकांचा थेट सहभागी करून घेतले जाणार आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी यांचे दालनात संबंधित प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. या वेळी नगरपंचायतीचे ताब्यातील जागेसह, कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या दुतर्फा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर शहरातील विकासक व खासगी मालकीच्या जागेत वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
स्थानिक प्रजातीच्या वीस झाडांची याकरिता निवड करण्यात आली असून, रोपांच्या उपलब्धतेनुसार झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेत गांभीयनि लक्ष घालून पावसाळ्याचे चार महिन्याच्या कालावधीत मोहीम राबवली जाणार आहे.
केवळ लागवडीपुरते मर्यादित न राहता लावलेली झाडे मोठी होईपर्यंत जीवंत राहावीत याकरिताही नगरपंचायतीने नियोजन केले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
सभेस मुख्याधिकारी अभिजित कुंभार, माजी नगरसेवक राजेश मर्चेंडे, नगरपंचायत कर्मचारी मनोज मर्चडे, सूरज बेलोसे, समीर साळवी, सह्याद्री प्रतिष्ठानचे राहुल खांबे, उपस्थित होते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 16/Jun/2025














