चिपळूण : दुकानदारांकडून शालेय साहित्याचे पॅकेज

चिपळूण : उन्हाळी सुटीत रमलेल्या शालेय विद्यार्थ्यांची आता पुढच्या इयत्तेत जाण्याची लगबग सुरू झाली आहे. अनेक दुकानदारांनी वह्या आणि पुस्तके वेगवेगळे न विकता इयत्तेनुसार पॅकेज तयार केले आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके, वह्या आणि लागणारे इतर साहित्य एकाच पॅकेजमध्ये आणि एका रकमेत पालकांना दिले जात आहे.

पालकांची खरेदी एकाच छताखाली व्हावी यासाठी व्यावसायिकांनी ही शक्कल लढवली आहे. सोमवारपासून (ता.१६) शाळा सुरू होणार आहेत. त्याकरिता तयारीला वेग आला आहे; मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा शालेय साहित्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

नवीन पुस्तके, वह्या, दप्तरे, वॉटरबॅग, गणवेश, पादत्राणे अशा आवश्यक गोष्टी खरेदी करण्याशिवाय पालकांपुढे कोणताही पर्याय नाही. वाढत्या महागाईच्या दिवसांत पालकांची आर्थिक ओढाताण होत असली तरी पालकांची खरेदीसाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी अनेक दुकानदारांनी एका छताखाली छत्रीपासून सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असे पॅकेज वेगवेगळ्या किमतीमध्ये तयार आहेत. २००० पासून पाच ते सात हजारापर्यंतचे एक पॅकेज आहे. त्यात शाळेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांची खरेदी करता येते. काही शाळा विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, सरावासाठीच्या वह्या या सर्वांचे एकत्र पॅकेज करून विद्यार्थ्यांना खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. त्याकरिता सुमारे दोन ते अडीच हजार रुपये पालकांकडून घेतले जात आहेत.

शाळांची उन्हाळी सुट्टी संपत आली आहे. दोन महिन्यांच्या दीर्घकालीन सुट्टीनंतर मुलांना शाळेतील मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ लागली आहे. दुसरीकडे नवीन शैक्षणिक वर्षांसाठी तयारी सुरू झाली आहे. विद्याथ्यांना नवीन इयतेसाठी पाठ्यपुस्तके, वह्या,सरावासाठी वह्या, पेन-पेन्सिल, कंपासपेटी तसेच दानर, रेनकोट, बूट, गणवेश या गोष्टी लागतात. त्या खरेदी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पालकांची दुकानांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. काही शाळांनी त्यांच्या शालेय शुल्कातही वाढ केली आहे.

पावसाचे दिवस आहेत, मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांची खरेदी सुरू होते. त्यात पालकांची धावपळ होऊ नये म्हणून एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू आम्ही मुबलक किमतीमध्ये पालकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत- आशीष खातू, लक्ष्मी स्टोअर, खेर्डी

शालेय साहित्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढते आहेत. पाल्यांना शिकवणे गरजेचे असल्याने कितीही दर झाले तरी शालेय साहित्य खरेदी करणे पालकांना भाग असते. एकच पाल्य असलेल्यांना महागाईच्या दिवसात खरेदी करणे कसेबसे शक्य होत आहे; मात्र, ज्या पालकांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले आहेत त्यांची मात्र कसरत होत आहे- प्रवीण सावंत, पालक सावर्डे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 16/Jun/2025