चिपळूण पालिकेत प्रभाग रचना नव्याने ?

चिपळूण : येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना यापूर्वीच झाली होती. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ती गुंडाळून ठेवण्यात आली. पालिका निवडणुकांचे पडघम सुरू झाल्यानंतर जुनी रचना कायम ठेवली जाणार की, नव्याने प्रभाग रचना केली जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

चिपळूण पालिकेवर मागील साडेतीन वर्षांपासून प्रशासक आहे. जुलै २०२२ मध्ये काही नगरपालिकांचा अंतिम निवडणूक कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता; परंतु, ओबीसी आरक्षणाविना हा कार्यक्रम जाहीर झाल्याने आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाकडून पुन्हा एकदा नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तेव्हा जुन्या ओबीसी आरक्षणानुसार ओबीसींसाठी प्रभाग तयार करण्यात आले होते. तसेच लोकसंख्येनुसार प्रभागही निश्चित करण्यात आले होते. नव्या रचनेनुसार पालिकेत एकूण २४ प्रभाग झाले आहेत.

आता पुन्हा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १७ जून ते ३ जुलै प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, चार ते आठ जुलै प्रभाग रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवणे, प्रभाग रचनेस मान्यता घेणे, १५ ते २१ जुलै प्रभाग रचना प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवणे, २२ ते ३१ जुलै हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे व १ ते ७ऑगस्ट अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी आयोगाकडे पाठवणे व २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेचे अधिसूचना जाहीर करणे, असे हे टप्पे आहेत. चिपळूण पालिकेने ही प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण केल्याने पूर्वीची प्रभाग रचना तशीच राहण्याची शक्यता आहे. नव्या रचनेत कोणता भाग कोणत्या जोडला जाईल.

निवडणूक विभागाने जो कार्यक्रम दिला आहे त्याची अंमलबजावणी केली जाईल. पालिकेने यापूर्वी ही प्रक्रिया राबवली होती. त्यामुळे नव्याने प्रभाग रचना आणि नकाशे तयार करताना जुने संदर्भ फायद्याचे ठरणार आहेत. ठरलेल्या कार्यक्रमानुसारच सर्व गोष्टी होतील. नागरिकांनाही विश्वासात घेतले जाईल. – मंगेश पेढामकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 16/Jun/2025