कणकवलीतील उड्डाणपुलाच्या खालील भागाला मोठा तडा

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणांतर्गत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. शहरातील या उड्डाणपुलाच्या पिलर क्रमांक तीनच्या ठिकाणी पिलरच्या जॉइंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालील सर्व्हिस रस्त्याच्या बाजूस काँक्रीटच्या काही भागांना मोठा तडा गेल्याची घटना समोर आली आहे.

तसेच साधारण तीन ते चार फुटांचा एक काँक्रीटचा तुकडादेखील निघालेल्या स्थितीत दिसून येत आहे. तो सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी किंवा वाहनांवर कोसळण्याचीदेखील भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे या पुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रीजचा काही भाग यापूर्वी कोसळला होता. त्यानंतर झालेले आंदोलन व घडलेल्या घटना यांनी कणकवलीतील उड्डाणपूल व बॉक्सेल ब्रीज हे चर्चेत आले होते. याच बॉक्सेल ब्रीजचा एस. एम. हायस्कूलजवळचा एक भाग खचल्याने, तर दुसऱ्या बाजूचा काही भाग कोसळल्याने गेली तीन वर्षे पुलावर या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावलेली आहेत. परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही.

कणकवलीत उड्डाणपुलाचा पिलर क्रमांक तीन हा स्टेट बँकेसमोर आहे. या पिलरवर उड्डाणपुलाच्या वरील काँक्रीटचे दोन्ही भाग ज्या ठिकाणी एकत्रित होतात, त्यापासून रस्त्याची पुलावरच्या संरक्षक भिंतीपर्यंतच्या पुलाच्या खालील भागाला पूर्णतः भेग गेल्याचे दिसत आहे. त्याठिकाणी काँक्रीटचा काही भाग भविष्यात कोसळू शकतो.

तंत्रज्ञांची टीम येणार

या संपूर्ण प्रकाराबाबत महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, शनिवारी त्या जागेची पाहणी केली असून, येत्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी येणार आहे. त्यानंतर याबाबत पुढील उपाययोजना काय कराव्या लागतील किंवा यासंदर्भात धोका आहे का, हे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:52 16-06-2025