गुहागर : नेहमीच्या अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने व्यवसायाभिमुख व विकासाभिमुख प्रगती साधावी यासाठी गुहागर तालुक्यातील मुंढर येथील श्री सिध्दीविनायक विद्यामंदिर येथे विविध उपक्रमांचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत. यातून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास साधला जात असल्याने ग्रामीण भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहाण्यास नक्कीच मदत होणार आहे.
लोकनेते डॉ. तात्यासाहेब नातूंच्या लोकसेवेचा वसा घेऊन चालवल्या जाणाऱ्या डॉ. नातू प्रतिष्ठानच्या या विद्यालयामध्ये उत्तम प्रतीच्या शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच अनेक विद्यार्थी विकासाभिमुख उपक्रम राबवले जातात. अध्यापनासाठी प्रत्येक वर्गामध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध आहे. एन. एम. एम. एस. स्कॉलरशिप, शासकीय रेखाकला परीक्षा यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे वैयक्तिक मार्गदर्शन, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, प्लंबिंग, पेंटिंग, सुतारकाम तसेच मुलींसाठी शिलाई काम व प्रथमोपचार प्रशिक्षणाचे प्राथमिक मार्गदर्शन केले जाते.
या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास साधला जात आहे. विद्यालयात २१ जुलै २०२५ पासून प्लंबिंग प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण दोन महिन्याचे असून एक महिना लेक्चर मुंढर येथे व एक महिना प्रॅक्टिकल पुणे ज्ञानदा गुरुकुल येथे होणार आहे. तरी गरजू, होतकरू विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 16/Jun/2025














