संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीत पिवळे दिसते, लवकरच औषध मिळेल, चंद्रकांत पाटलांचा मिश्कील टोला

सांगली : संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीत पिवळे दिसते. कावीळ झाल्यावर सारे पिवळे दिसते, तसे झाले आहे. या कावीळवर औषध मिळते, ते लवकरच त्यांना मिळेल, असा मिश्कील टोला जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

सांगली मारुती चौकात भाजप सांगली शहरतर्फे मोदी सरकारच्या ११ वर्षांतील उल्लेखनीय विकासकामांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, संजय राऊत यांची प्रत्येक गोष्टीत छिद्र दिसते. त्यांची नजर पिवळी वाटते. त्यांना कावीळ झाली असून, मला माहिती आहे त्याच्यावर काय औषध आहे. ते औषध मिळेपर्यंत असेच करत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल पंधरा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले असून, अकरा वर्षे काम करीत आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे मिळून तब्बल २६ वर्षे एका उच्चपदावर राहण्याचा त्यांनी विक्रम केला. भारतात सोडा जगातही असा विक्रम कुणाला करता आला नाही. त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला आहे.

मागील अकरा वर्षांत पंचवीस कोटी लोकांना मोदींनी दारिद्र्यरेषेतून वर आणले. ज्यांना घर नाही, गॅस नाही, नळपाणी नसलेल्या लोकांना मदत केली. नागरिकांना मोफत धान्य, आयुष्मान भारतमधून आरोग्य सुविधा मिळाल्या. झोपडपट्टीपासून ते अंबानीपर्यंत असा एकही घटक नाही, ज्यांना काही मिळाले नाही, अशी मोदींची अकरा वर्षांची कारकीर्द प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे.

राज ठाकरेंचा अंदाज येणे कठीण

राज ठाकरे हे वादळी व्यक्तिमत्त्व आहे. वादळाचा जसा अंदाज येत नाही, तसा त्यांचाही अंदाज कोणी सांगू शकत नाही. लवकरच आपल्याला कळेल, वादळाची दिशा काय ते समजेल, असे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:52 16-06-2025