लांजा : रूण गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य

लांजा : तालुक्यातील रूण गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून आधीच सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना आता जागोजागी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी देखील वाढली आहे. यामुळे पादचारी, वाहन चालक आणि प्रवासी वर्ग यांची मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची डागडुजी करून रस्ता वाहतूकयोग्य न केल्यास ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रुण येथील सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, वसंत सावंत यांनी दिला आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील रुण या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातून वाट करताना वाहनचालकांना यामध्ये विशेषतः दुचाकी आणि रिक्षासारख्या वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून एसटी वाहतूक देखील सुरू आहे. या गावातील अनेक विद्यार्थी हे लांजा, साटवली या ठिकाणी हायस्कूल तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात जात असतात. तसेच अन्य प्रवाशांचा देखील समावेश आहे.

रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसल्याने ही वेळ आली आहे. या रस्त्यावरती रहदारीही मोठ्या प्रमाणामध्ये असते. गावची लोकसंख्या ही मोठी असून गावाला जोडणारा हा एकच मार्ग आहे.

सध्या पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहन चालकांना याचा मोठा फटका बसत आहे यासंदर्भात जि प बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सुद्धा भेटून कल्पना देण्यात आलेली आहे. तरीसुद्धा संबंधित अधिकारी यांच्याकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रस्त्याच्या दूरवस्थेमुळे एखादा अपघात झाल्यास त्याला संबंधित विभागाचे अधिकारी हे जबाबदार राहतील असा इशाराही देण्यात आलेला आहे. दरम्यान, लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, वसंत सावंत यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 16/Jun/2025