रत्नागिरी, १६ जून:
रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथील जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ ने गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात केलेली प्रगती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. डायट रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. सुशील शिवलकर यांनी आज झालेल्या शाळेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलताना, पाली जि.प.ची ही प्राथमिक मराठी शाळा जिल्ह्यातील इतर शाळांसाठी एक आदर्श उदाहरण असल्याचे प्रतिपादन केले.
पाली शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी नवोदय आणि शिष्यवृत्तीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे, तसेच क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्हा पातळीवर उत्तम यश संपादन केले आहे. ही बाब शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीची द्योतक आहे.
आज पाली येथे जि.प. आदर्श विद्यामंदिर पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला डायट रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. सुशील शिवलकर यांच्यासह अधिव्याख्याता राहुल बर्वे, दीपा सावंत, जिल्हा समन्वयक निकुंबे सर, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, ॲड. सागर पाखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष प्रार्थना ठीक आणि पूर्वा पावसकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत शैक्षणिक पालखी दिंडी काढून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशावेळी त्यांच्या पहिल्या पाऊलाचा ठसा उमटवण्यात आला, जो एक प्रेरणादायी क्षण ठरला. त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पाली शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, मारुती घोरपडे, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव आणि श्रुती वारंग यांनी विशेष परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:12 16-06-2025














