रत्नागिरी, १६ जून :
तालुक्यातील नाणीज गावामध्ये मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या चौपदरीकरणाचे अपूर्ण कामे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरली आहेत. अपुऱ्या गटारी, सेवा रस्ते आणि अंडरपासमुळे पावसाचे पाणी तुंबून तब्बल अकरा घरांमध्ये शिरले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिक मोठ्या गैरसोयीचा सामना करत असून, रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाणीज बाजारपेठेत चौपदरीकरणाची अनेक कामे अजूनही अर्धवट आहेत. यामुळे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नाणीज शिक्षक कॉलनीतील श्री. सरफरे, श्री. शिंदे, श्री. तोंडले, श्री. पाटील, श्री. तांदळे, श्री. कोलापटे, संदेश काळे, नितीन रणसे यांच्या घरांमध्ये पाणी आणि चिखल शिरून मोठे नुकसान झाले आहे. कॉलनीतील काही बंद घरांमध्येही पाणी घुसल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. पाणी निचरा होण्यासाठी कंत्राटदार कंपनीला जेसीबी मशीन पाठवण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र दोन दिवस उलटूनही मशीन न आल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे.
याचबरोबर, महामार्गावरील खानू गावच्या फाट्याजवळील काही घरांमध्ये गटारे नसल्याने पाणी थेट घरात आणि दुकानांमध्ये शिरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी आणि नाणीज पोलीस पाटील नितीन कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बाजारपेठेतील सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे पाणी साठल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच, अनेक ठिकाणी गटारे उघडी असल्याने पादचाऱ्यांच्या दुर्घटनेची शक्यताही निर्माण झाली आहे.
पाली, खानू आणि नाणीज या गावांमध्ये मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने यंदाच्या पावसात ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे संबंधित कंत्राटदारावर शासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 16-06-2025














