पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटप; ‘तुमची जिद्द प्रेरणादायी’

रत्नागिरी, दि. १६ जून: रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी दिव्यांग बांधवांची जिद्द आणि संघर्षाचे कौतुक केले. “धडधाकट लोकांनाही लाजवेल, असा संदेश तुम्ही आम्हाला देत असता. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, ही भूमिका ठेवून शासन, अधिकारी, सर्वजण कार्यरत असतो. तुमच्याकडे बघून आमच्यामध्ये नवी प्रेरणा, नवी ऊर्जा तयार होत असते,” असे प्रतिपादन डॉ. सामंत यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन आणि उपस्थित मान्यवर

सामाजिक न्याय अधिकारिता व दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, भारत सरकार, सामाजिक न्याय विभाग, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि महेश म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.

योजनांचा लाभ प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न

पालकमंत्री डॉ. सामंत पुढे म्हणाले की, “दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजना, ज्येष्ठ नागरिकांची वैयक्तिक योजना असेल, तीर्थ दर्शन योजना असेल अशा सगळ्या योजनांचा लाभ महाराष्ट्र सरकार तुमच्यापर्यंत पोहोचवताना त्याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका अतिशय प्रामाणिकपणानं समाज कल्याणचे अधिकारी करताहेत.” आयुष्य अडचणीचे असताना त्यावर मात करण्याचा धडा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक नेहमीच देत असतात, असेही त्यांनी नमूद केले.

सामाजिक दायित्वाची भावना आणि समाधानाचा क्षण

समाजातील प्रत्येक घटकाप्रती आपले काहीतरी देणे लागतो, या भूमिकेतून असे कार्यक्रम आयोजित केले जातात. “जीवनामध्ये पुढचे आयुष्य सुखी समाधानी करण्यासाठी एक विलक्षण प्रेरणा आम्हाला मिळाली. अद्भुतपूर्व आनंद तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांना बघायला मिळतोय. याचे वेगळे समाधान आज आहे,” अशा भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. सहाय्यक आयुक्त श्री. घाटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर अभिलाषा ढोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 17-06-2025