चिपळूण एसटी स्टँडवर प्रवाशाची सोन्याची चेन लंपास!

चिपळूण : चिपळूण एसटी स्टँडवर बसमध्ये चढत असताना एका ज्येष्ठ महिलेची सोन्याची चेन चोरीला गेल्याची धक्कादायक घटना १५ जून रोजी सकाळी ९.२५ वाजता घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी शीतल शांताराम चाळके (वय ६०, रा. लोटेमाळ, चाळकेवाडी, खेड) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शीतल चाळके या त्यांची भाची रुची संतोष शिर्के (वय २०) यांच्यासोबत दोणवली गांग्रई एसटी बसमध्ये चढत असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २३ ग्रॅम ९२० मिली वजनाची, २५ इंच लांबीची सोन्याची चेन लंपास केली. या सोन्याच्या चेनची किंमत अंदाजे १,००,०००/- रुपये आहे.

ही घटना १६ जून रोजी रात्री ९.१७ वाजता पोलिसांत दाखल करण्यात आली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिपळूण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

प्रवाशांनी सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 17-06-2025