चिपळूण : चिपळूण कऱ्हाड मार्गावरील पाटण तालुक्यातील वाघे येथे पूल वाहून गेला. परिणामी, कुंभार्ली घाटातून कराडकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. पर्यायी मार्ग म्हणून ही वाहतूक भोर आणि आंबा घाटातून वळवण्यात आली आहे. कुंभार्ली घाटातून वाहतूक बंद झाल्याने कराड, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला.
चिपळूण-कऱ्हाड मार्गावर पाटण ते कोयनादरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या काँक्रिटीकरणासाठी काही ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम केले आहे. काही ठिकाणी पुलांची बांधकामे सुरू आहेत.
सोमवारी झालेल्या जोरदार पावसात पाटण-वाघे येथील पूल वाहून गेला. त्यामुळे चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. कुंभार्ली घाटातून वाहने सोडू नयेत, अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. त्यामुळे कोल्हापूर-कऱ्हाडकडे जाणारी वाहतूक आंबा घाटमार्गे वळवण्यात आली. पुणे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक भोर घाटातून वळवण्यात आली, तशा सूचना वाहतूक पोलिस यांच्यासह प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. दुपारी अचानक या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने पुणे तसेच कोल्हापूर, सांगली, कऱ्हाडकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 17/Jun/2025














