गावडेआंबेरे येथील सातपऱ्या पूल चार वर्षांनी वाहतुकीस खुला

पावस : चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावडेआंबेरे सातपऱ्या पूल वाहतुकीस खुला झाल्याने वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

२०२१ मध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुडीत क्षेत्र कार्यक्रमांतर्गत आठ कोटींचा निधी मंजूर करून पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली; परंतु या कामात वारंवार अडचणी निर्माण झाल्यामुळे गेली तीन वर्षे काम रखडले होते.

पहिल्या टप्प्यात पुलाचे काम, दुसऱ्या टप्प्यात गावडे आंबेरे भागातील भरावाचे काम, तिसऱ्या टप्प्यात पुलाच्या कठड्याचे काम आणि चौथ्या टप्प्यात मावळंगे भागातील भरावाचे काम करण्यात आले. ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यामुळे हे काम सुरू झाले. अखेर भरावाचे अंतिम टप्प्यातील व डांबरीकरणाचे काम सुरू असताना पावसाने लवकर सुरुवात केली. त्यामुळे या मार्गावरील किरकोळ काम शिल्लक राहिले; मात्र उर्वरित रस्ता डांबरीकरण झाल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वाहनचालक, ग्रामस्थांना दिलासा मिळेल
या संदर्भात ग्रामस्थ स्वप्नील शिवनेकर म्हणाले, ‘या मार्गावर छोट्या व कमी उंचीच्या पुलामुळे वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांची पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होत होती. पुलाचे काम सुरू झाल्यापासून लवकरात लवकर काम पूर्ण होऊन वाहनचालक व ग्रामस्थांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रतिवर्षी टप्प्याटप्प्याने काम सुरू झाल्यामुळे कामाला बराच कालावधी गेला. अखेर यंदा रस्ता वाहतुकीस खुला झाल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.’

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 17/Jun/2025