पार्किंगच्या वादातून रत्नागिरीत रिक्षाचालकाला मारहाण

रत्नागिरी, १६ जून २०२५ : शहरातील स्टेट बँक कॉलनी, चर्मालय येथील जेट एम. पाटणकर रेसिडेन्सीजवळ पार्किंगच्या जागेवरून झालेल्या वादामुळे एका रिक्षाचालकाला मारहाण झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३:४५ वाजता घडली. या मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला आहे.

याप्रकरणी फजल अब्दुल लतीफ गुहागरकर (वय ३९, रा. जेट एम. पाटणकर रेसिडेन्सी, स्टेट बँक कॉलनी, चर्मालय, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ते आपली रिक्षा (क्र. एम.एच. ०८ ए.क्यु. ४५९०) घेऊन घरी परतले होते. त्यावेळी आरोपी शोएब आझाद मुकादम (वय ३५, रा. कोकणनगर, रत्नागिरी) यांच्या दुकानाचे सामान घेऊन आलेला ट्रक इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर उभा होता. त्यामुळे फिर्यादींना आपली रिक्षा पार्किंगमध्ये घेण्यास अडचण येत होती.

फिर्यादींनी आरोपीला ट्रक बाजूला करण्यास सांगितले असता, आरोपीला याचा राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून तेथील एक दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर मारला, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री ९:३१ वाजता करण्यात आली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१) आणि ३५२ नुसार शोएब आझाद मुकादम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 17-06-2025