चिपळूण : दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळुणातील वाशिष्ठी आणि शिव नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह एनडीआरएफ टीमने नदीकिनारी जाऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान, वाशिष्ठी व शिव नदीतील पाण्याची पातळी नियंत्रणात आहे. कोळकेवाडी धरणातून विद्युत निर्मिती करून प्रशासनाच्या निगराणीखाली पाणी सोडण्यात येत आहे.
चिपळूणमध्ये सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे नदीकिनाऱ्या लगतच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चिपळूण नगर परिषद प्रशासन, महसूल विभाग अलर्ट असून एनडीआरएफचे पथक ठिकठिकाणी भेट देऊन पाहणी करत आहे. सोमवारी दुपारी ११ च्या सुमारास वाशिष्ठीची पाणी पातळी ४ मीटरपेक्षा जास्त झाली होती. यावेळी प्रशासनाने बाजार पूल भागात भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
दुपारनंतर पावसाचा जोर कमी झजल्याने वाशिष्ठीची पाणी पातळी कमी झाली व ती धोक्याबाहेर गेली नाही. दुपारी ३ नंतर पाणी पातळी ३.६८ मी. पर्यंत खाली आली. सायंकाळी ४ वा. हायटाईड असल्याने कोळकेवाडी धरणातून विद्युत निर्मितीसाठी एकच जनित्र चालविण्यात आले, त्यामुळे वाशिष्ठी नदीतील पाणी पातळी सायंकाळपर्यंत कमी होत होती.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन अलर्ट मोडवर असून कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवून आहे. भरती-ओहोटी आणि पावसाचा जोर लक्षात घेऊन विद्युत निर्मिती केली जात आहे. सद्यस्थितीत वाशिष्ठी, शिव नदी दुथडी भरून वाहत असून शहरातील जनजीवन सुरळीत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 17/Jun/2025














