चिपळूण : मुंबई-गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटात खचलेल्या काॅंक्रिटीकरणाच्या भागात उभारलल्या जात असलेल्या गॅबियन वॉलसाठी टाकलेला भराव मुसळधार पावसात पायथ्यालगतच्या पेढे गावात वाहून गेल्याने भरवस्तीत चिखल व दलदल निर्माण झाली आहे.
तसेच या वाॅलला भगदाड पडले असून, ही वाॅल काेसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून परशुराम घाटातील मध्यवर्ती भागात लोखंडी जाळीच्या आधारे गॅबियन वॉल उभारली जात आहे. सुमारे ९० मीटरहून अधिक लांबीची ही भिंत दगड व मातीच्या मिश्रणातून उभारण्यात येत आहे. आत्तापर्यंत या भिंतीचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही बरेचसे काम बाकी असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात भरावाची माती टाकण्यात आली आहे.
मात्र, आता पावसाच्या पाण्यासोबतच ही माती वाहून डोंगराच्या पायथ्याला असलेल्या वस्तीत येऊ लागली आहे. त्यामुळे भरवस्तीत दलदल निर्माण झाली आहे. घरांच्या आजूबाजूला चिखल साचल्याने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करूनही दखल घेतलेली नाही. आता पावसामुळे ही परिस्थिती हाताबाहेर गेली असून, त्याचा धोका अधिक वाढला आहे.
सवतसडा धबधबा आणि घाटातील वरून येणारे पाणी हे फरशी तिठा येथे येऊन साचते. फरशी पुलाखाली खाेलगट भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने येथील वाहतूक बंद ठेवावी लागते.
मे महिन्यातील पावसातही परशुराम घाटातील माती गावच्या शेतात आली होती. ही माती काढण्याची मागणी केल्यानंतर काही प्रमाणात ती काढण्यात आली. सातत्याने मागणी करूनही ठेकेदार कंपनीकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास गणेश विसर्जन करणेही कठीण होणार आहे. ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. – आरूषी शिंदे, सरपंच, पेढे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 17/Jun/2025














