महाराष्ट्रात सहकार चळवळ वाढवली-रुजवली; शरद पवारांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले : सुप्रिया सुळे

माळेगांव : महाराष्ट्रात सहकार चळवळ वाढवली-रुजवली आणि आज त्याचा वटवृक्ष झाला हे फक्त शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले. पवार साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सहकारी साखर कारखान्यांना परवानगी दिली.

डिस्टिलरी प्रकल्प उभारण्याला मदत केली. तसेच त्या कारखान्याचे स्वतःचे शाळा-कॉलेज असले पाहिजे असा आग्रह धरून परवानगीसाठी राज्य शासनाकडून मदत केली. आज शरद पवारांच्या दूरदृष्टीमुळेच अनेक मुलं मुली परदेशात नोकरी व्यवसाय करीत आहेत,असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी पणदरे येथे बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ बारामतीच्या खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

सुळे म्हणाल्या, बारामती तालुक्याने आम्हा पवार कुटुंबीयांना नेहमीच भरघोस मतांनी विजयी केले. मी आणि स्वतः पवार साहेब आम्ही दोघेही माळेगाव कारखान्याचे सभासद असल्याने आम्हालाही वाटते माळेगाव कारखाना हा नेहमी राज्यात अग्रेसर असावा. कारण माळेगाव कारखाना आणि शरद पवार हे समीकरण सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे नेहमी माळेगाव कारखान्याने उच्चांक दर द्यावा, सभासदांचे कामगारांचे हित जपावे ,याकडे आमचे कटाक्षाने लक्ष असते. माळेगाव कारखाना परिसरातील प्रत्येक अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येत बळीराजा सहकार बचाव पॅनलची बांधणी आणि उभारणी केली आणि मला पवार साहेबांना फोन करून पॅनलला पाठिंबा देण्याची विनंती केली. सामान्य शेतकऱ्यांनी हा पॅनल बांधल्याने आम्हीही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही सभासदांच्या हिताचेच निर्णय घेऊ असे सुळे म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 17-06-2025