इगतपुरी : नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा आजपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने नव्या आदेशाची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार दिवसभरात विद्यार्थ्यांची तीन वेळा हजेरी घेतली जाणार आहे. गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तत्काळ ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश या आदेशात केला आहे. प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना लगेचच कळवले जाणार आहे. सर्व शाळांना दिवसातून सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशी तीनवेळा विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. यंदापासून सर्व शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सीसीटीव्ही बंधनकारक
विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शाळेच्या सर्व परिसरात सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे शाळेतील कोणताही अनुचित प्रकार टाळता येणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरा वर्गाचे दरवाज, मार्गिका, प्रवेशद्वार, मैदाने तसेच स्वच्छतागृहांबाहेर लावणे बंधनकारक असणार आहेत. या सीसीटीव्हीचे एक महिन्याचे चित्रण जतन आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करताना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तत्काळ समाप्त करणे, आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी, असे नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थी सुरक्षिततेची जबाबदारी
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नवे नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींनुसार सकाळी, दुपारी व सायंकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 17/Jun/2025














