रत्नागिरी : दि आर्टऑफ लिव्हिंगतर्फे महाराष्ट्रात सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीत मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाचा सुवर्णयोग येत्या बुधवार आणि गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे.
बुधवारी १८ जून रोजी रत्नागिरीत रुद्र पूजा आणि दर्शन सोहळा सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी १९ जून रोजी सायंकाळी ६.०० ते ८.३० या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयाजवळच्या मराठा मंडळात दर्शन सोहळा होईल.
अकराव्या शतकात मोहम्मद गजनी याने सोमनाथ मंदिरावर चढाई करून पवित्र शिवलिंगाचे तुकडे केले. त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री यांनी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन पूजा केली आणि हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले. 1924 साली कांचीचे परमचार्य यांनी सांगितले की 100 वर्षांनी बंगलोरमध्ये असलेले संत येतील. त्यांना ते शिवलिंग नेऊन द्यावे. त्यानुसार तज शिवलिंग गुरुदेव श्रीश्री रविशंकर यांच्याकडे बंगलोर आश्रमामध्ये सुपूर्त करण्यात आले.
याच मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष जनतेसमोर यात्रेद्वारे आणले जात आहेत. ते भारताच्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य भाग आहेत. या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र अवशेषांचे सर्व समाजाला दर्शन मिळावे हा उद्देश ठेवून गुरुदेव त्यांचे अनुयायी भारतातील सर्व भागांमध्ये पाठवत आहेत.
ही यात्रा तळकोकणातून सुरू होत असून रत्नागिरी शहरात हे ज्योतिर्लिंग येत आहे. सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 17-06-2025














