जे भापसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राष्ट्रवादाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे पक्षाच्या वर्धापनदिनापर्यंत हा सस्पेन्स कायम होता.

मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या सगळ्या चर्चांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. जे भापसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे. गांधी, शाहू, फुले आणि आंबडेकरांचा विचार असणाऱ्यांना सोबत घेऊ असेही शरद पवार यांनी म्हटलं. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे अनेकवेळा एकाच व्यासपीठांवर आल्याने या चर्चांना उधाण आलं होतं. पुण्यातील साखर संकुलातील बैठकीवेळी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली होती. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी हे मोठे विधान केले आहे. संधीसाधूपणा करणाऱ्यांना आम्ही सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेण्यावर शरद पवार यांनी नकारघंटा वाजवली आहे.

“सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असण्याचे कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरु, चव्हाण, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार असेल तर आम्हाल मंजूर आहे. पण सत्तेच्यासाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. त्यामुळे संधीसाधूपणाचे राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचे नाही. त्या दृष्टीकोनातून आपल्याला पावले टाकायची आहेत,” असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्या या विधानावर बोलताना अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 17-06-2025