रत्नागिरी, १७ जून २०२५ : रत्नागिरी तालुक्यातील पाली कापडगाव येथे आज सकाळी विद्युत वाहिनी दुरुस्त करत असताना अचानक लोखंडी खांब कोसळल्याने एक वायरमन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कापडगाव, सुतारवाडी येथे सुचित सुरेश घाणेकर (सध्या नेमणूक कापडगाव, मूळ रा. खानू) हे वायरमन विद्युत खांबावर चढून वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत होते. काम करत असताना अचानक तो उभा लोखंडी खांब खाली कोसळला, त्यामुळे घाणेकर जोरदारपणे जमिनीवर आदळले आणि गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुचित घाणेकर यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 17-06-2025














