दापोली : दापोली तालुक्यात दरडप्रवण ११ गावांतील ३३८ कुटुंबांना दापोली तालुका प्रशासनाने स्थलांतराच्या नोटीस बजावल्या आहेत. गावातील शाळा, मंदिरे आशा ठिकाणी या कुटुंबांना सुरक्षित राहता यावे, यासाठी शासनाने उपाययोजना करून ठेवली आहे.
पावसाळा सुरू झाला की, दरडप्रवण गावांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या दृष्टीने शासन दरवर्षी उपाययोजना करते.
यावेळी तालुक्यात हर्णे, दाभोळ या गावांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना काही वर्षांपूर्वी घडलेल्या आहेत. दाभोळ व हर्णेमध्ये रात्रीच्या सुमारास दरड कोसळून मोठी जीवितहानीदेखील यापूर्वी झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात संकट येण्याआधी दापोली प्रशासनाकडून सावध भूमिका घेतली जाते. यामध्ये हर्णे, पाजपंढरी, मुगीज, उन्हवरे, मांदिवली, केळशी, आसूद, आंबवली, टाळसुरे, आडे विठ्ठलवाडी, नानटे या गावांमधील एकूण दरडप्रवण ३३८ कुटुंबांना लगत असणाऱ्या शासकीय शाळा, तसेच मंदिरे आशा सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी बेसुमार उत्खनन करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक ग्रामस्थ डोंगराच्या खाली घरे बांधून रहात आहेत तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. यामुळे घरांमध्ये पाणी शिरून नुकसान होते. जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना डोंगर भागात आसरा घ्यावा लागतो.
परंतु अशा वेळी दरड, मोठी वृक्ष, आणि वादळाचा सामना करावा लागतो. यात दरवर्षी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना नुकसान सहन करावे लागते. शासन जरी नुकसान भरपाई देत असले तरी तातडीने काम करून घेण्यासाठी ग्रामस्थांकडे पैसा नसल्याने त्यांना दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात. त्यामुळे शासनाने निसर्गाचा समतोल टिकून राहील, याकडे लक्ष देऊन भविष्यात लोकांना आणखी स्थलांतरित व्हावे लागणार नाही, अशी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 18/Jun/2025














