ॲड. अमोल शिंदे ठरले रत्नागिरीचे पहिले ‘कराओके आयडॉल’

रत्नागिरी, १५ जून २०२५: ‘गुंजन इव्हेंट्स’ आयोजित ‘रत्नागिरीचा कराओके आयडॉल २०२५’ सीझन १ च्या अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत ॲड. अमोल शिंदे यांनी आपल्या सुमधुर गायनाने तमाम रत्नागिरीकर प्रेक्षक आणि परिक्षकांची मने जिंकत या स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. वीर सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या या संगीत मैफिलीत त्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

जवळपास दोन महिने चाललेल्या या स्पर्धेच्या ऑडिशनमध्ये ५५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, ज्यामधून ५२ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या नाविन्यपूर्ण स्पर्धेला रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे अंतिम सोहळ्याला नाट्यगृह तुडुंब भरले होते.

अंतिम फेरीत सौ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर श्री. रवींद्र जाधव यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. याव्यतिरिक्त, इतर ८ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक श्री. अण्णा सामंत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी, ‘गुंजन इव्हेंट्स’तर्फे श्री. कांचन मालगुंडकर, श्री. अमेय वीरकर, श्री. गौरांग आगाशे यांच्यासह इतर युवा उद्योजकांचा आणि ‘युथ आयकॉन’ म्हणून श्री. केदार उर्फ मुन्ना देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी, राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री श्री. उदयजी सामंत यांनी ‘गुंजन इव्हेंट्स’च्या या धाडसी आणि यशस्वी उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी भविष्यात ‘महाराष्ट्राचा कराओके आयडॉल’ ही स्पर्धा आयोजित करण्याची सूचना केली आणि त्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बक्षीस वितरण सोहळ्याला मैत्री ग्रुपचे श्री. कौस्तुभ सावंत, पद्मावती कन्स्ट्रक्शनचे श्री. विकी शेठ जैन, श्री. अमोल डोंगरे, परिक्षक श्री. सतीश राठोड, श्री. मतीन कापडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲड. अमित नागवेकर आणि ॲड. सरताज कापडी यांनी, ही स्पर्धा रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वात एक नवा अध्याय सुरू करणारी ठरली असून भविष्यातही अशा प्रकारे नवनवीन प्रतिभांना संधी देत राहू, असा विश्वास व्यक्त केला. गुंजन ग्रुपचे श्री. राज चव्हाण, श्री. निखिल भुते, अभिलाष पिळणकर आणि श्री. दीपक डांगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 18-06-2025