खेड : जगबुडी नदीवरील ब्रिटिशकालीन पुल धोकादायक

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जगबुडी नदीवर ब्रिटिश काळात बांधलेला पूल आजही वापरात असून त्याच्या धोकादायक स्थितीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या दोन्ही बाजूंनी नवीन पूल बांधण्यात आलेले असतानाही पूल न तोडता तसाच सोडून दिला गेला आहे.

या पुलाचा वापर सध्या काही स्थानिक नागरिक भंगार व्यवसाय तसेच कचरा टाकण्यासाठी करत आहेत. पुलावर रेलिंग नसल्याने आणि कठडे तुटलेले असल्याने कोणतीही सुरक्षितता शिल्लक राहिलेली नाही. पावसाळा सुरू झालेला असून नदी धोक्याच्या पातळीवर आहे. अशा परिस्थितीत हा पूल वापरणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.

स्थानिक नागरिकांतून या गंभीर विषयावर संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित विभाग व स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. मात्र एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेदेखील स्पष्ट करण्यात येत आहे.

एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण?
कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. या पुलाचे सर्व रेलिंग तुटले असून त्याची स्थिती अत्यंत धोकादायक आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही हे दुर्दैवी आहे, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते अनिल येसोंडे यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 18/Jun/2025