रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती झाली आहे.
भारत सरकारच्या कॅबिनेट समितीने संरक्षण खात्याच्या शिफारशीनुसार ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड लि. या कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून ही फेरनियुक्ती केली आहे. याआधी सन २०२१ ते २०२४ पर्यंत ॲड. पटवर्धन यांनी गोवा शिपायार्डचे स्वतंत्र संचालक म्हणून पदभार घेतला होता. तीन वर्षांतील त्यांच्या कामाचा प्रभाव, गोवा शिपयार्डने फेरनियुक्तीची केलेली मागणी, केंद्र शासनाच्या कॅबिनेट सर्च कमिटीने केलेली छाननी या सर्व प्रक्रियेतून पार पडत त्यांची फेरनियुक्ती झाली आहे. त्याबद्दल स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी ॲड. पटवर्धन यांचे अभिनंदन केले.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांची झालेली ही निवड आमच्यासाठी मोठ्या गौरवाची आहे, असे उद्गार संस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे यांनी काढले.
यावेळी संस्थेचे संचालक प्रसाद जोशी, शरद्चंद्र लेले, संतोष प्रभू, मधुरा गोगटे, अजित रानडे, संस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज इत्यादी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 18-06-2025














