गावतळे : दापोली ततालुक्यातील देगाव महावितरण उपकेंद्राच्या परिसरात ३३ केव्ही वाहिनीवर पडलेले तीन खांब ९ तासात उभे करत वीजप्रवाह पूर्ववत केल्याने अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
१६ जूनला पहाटे जोरदार वारा आणि पावसामुळे देगाव येथील महावितरण उपकेंद्राच्या बाजूला असलेल्या कुणबी भवनच्या मागे ३३ केव्ही वाहिनीवरील तीन खांब पडले होते. त्यापैकी दोन मोठे तर एक लहान खांब होता. मुख्य वीजपुरवठा करणारी लाईन बंद झाल्याने ३२ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
देगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता सिद्धारूढ तेवरे यांनी पहाटे ६ वाजता माहिती मिळाल्यानंतर सर्व वायरमन आणि लाईनमन यांना फोन करून माहिती दिली. तसेच ठेकेदारांना मदतीसाठी बोलावून घेतले. सकाळी ८ वाजता महावितरणचे ९ कर्मचारी आणि ठेकेदाराची माणसे यांनी काम सुरू केले. दोन खांब जंगलमय भागात होते तर एक खांब सपाट भागात होता.
पाऊस दमदार पडत असूनही हे कर्मचारी अविरत काम करत होते. पडलेले जुने मोठे दोन खांब आणि एक नवीन खांब उभे करून दुपारी साडेचार वाजता वीजपुरवठा पूर्ववत केला. या परिसरातील नागरिकांनी महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यासाठी उपअभियंता परेश सागवेकर, उपकार्यकारी अधिकारी नीलेश भेंडाळे यांनीही मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 18/Jun/2025














