चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वजेगाव (ता. पाटण) येथे तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्याचा भराव वाहून गेल्यामुळे कुंभार्ली घाटातून होणारी वाहतूक बंद झाली आहे. त्याचा परिणाम उत्तर रत्नागिरीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे.
ही घटना समजल्यानंतर चिपळूण, दापोली, खेड, गुहागर आणि मंडणगड येथून कुंभार्ली घाटमार्गे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही फेऱ्या आंबाघाट आणि रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी, भोर घाटमार्गे वळवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन लांबचा प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहतूक करणारी वाहने कुंभार्ली घाटमार्गे घेऊन जाऊ नयेत, अशा सूचना प्रशासनाने देऊनही काहीजण कुंभार्ली घाटातून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना कुंभार्ली घाटातील पोलिसांनी अडवून माघारी पाठवले. शिरगाव येथेही अवजड वाहनांवर नजर आहे.
चिपळूणमधून सांगली, सातारा, कोल्हापूरला जाण्यासाठी अजून रेल्वेची सोय नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना कुंभार्ली घाट हा सोयीचा रस्ता आहे. याच घाटमार्गे पश्चिम महाराष्ट्रातून फळ, भाजीपाला, कडधान्य, दूध या वस्तूंसह इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक चिपळूणमध्ये होते. कुंभार्ली घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे आंबाघाटातून पुढे साखरपा, संगमेश्वरमार्गे जातात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेत झाला; मात्र लांबून आल्यामुळे झालेला इंधनखर्च हा पुरवठादारांना सहन करावा लागला. चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोलीतून दररोज लहान, चारचाकी वाहने मिरज मार्गावर धावतात त्या रद्द करण्यात आल्या. पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स साखरपामार्गे सोडण्यात आल्या. चिकन पुरवणाऱ्या कंपन्यांच्या गाड्याही साखरपामार्गे चिपळूण गुहागर, खेडमध्ये आल्या.
चिपळूण आगारातून पश्चिम महाराष्ट्रात दररोज सकाळी सहा ते रात्री साडेदहापर्यंत ३४ फेऱ्या होतात. यातील पन्नास टक्के फेऱ्या रद्द केल्या आहेत. पुण्याकडे जाणारी एसटी ताम्हिणी घाटमार्गे वळवण्यात आली आहे-दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 18/Jun/2025














