राजापूर बाजारपेठेतील जनजीवन पूर्वपदावर

राजापूर : तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांना यावर्षी पहिल्यांदा आलेल्या पुराचा शहराला पडलेला वेढा सुमारे दहा तासांनी सुटला. जवाहर चौक परिसरानेही मोकळा श्वास घेतला आहे. पूरस्थिती ओसरल्यामुळे शहरासह बाजारपेठेतील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. शहरातील विविध भागांसह दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसून साचलेला चिखल आणि गाळ काढताना व्यापाऱ्यांची दमछाक झाली.

सातत्याने अतिवृष्टी राहिल्याने अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होऊन दोन्ही नद्यांना सोमवारी (ता. १६) पहाटेला पूर आला होता. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले. शहरातील अनेक भागात पुराचे पाणी मुसल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले होते पुराच्या पाण्याने जवाहरचौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पायथ्यापर्यंत धडक दिली होवो, मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे सायंकाळी म्हणजे तब्बल दहा तासानंतर हळूहळू परस्थिती ओसरू लागली. जवाहरचौक परिसर, शिवाजीपथ रस्ता बंदरधक्का परिसर, वरचीपेठ रस्ता आदी परिसर मोकळा झाला. पुराचे पाणी ओसरताच व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये साचलेला गाळ आणि चिखलाची साफसफाई करण्याचे काम हाती घेतले, रस्त्यांवर साचलेला गाळ आणि सार्वजनिक ठिकाणी गोळा झालेल्या कच-याची साफसफाई पालिका प्रशासनाने केली.

दरवर्षीच्या पूरस्थितीच्या पूर्वानुभवामुळे व्यापारी सतर्क होते. पुराचे पाणी घुसण्यापूर्वी दुकानातील माल त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलविला होता. त्यामुळे दहा तासाहून अधिक काळ पाणी बाजारपेठेत होते तरीही व्यापाऱ्यांचे फारसे नुकसान झाले नाही. पुरस्थिती ओसरल्याने बाजारपेठ, शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 18-06-2025