विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा शिक्षक शाळेत परतला; राजापूरमध्ये पालक-ग्रामस्थ आक्रमक!

राजापूर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजापूर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. सप्टेंबर २०२४ मध्ये विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप असलेला शिक्षक बलवंत आनंदा मोहिते याला पुन्हा शाळेत रुजू करून घेण्यात आल्याने पालक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी शाळेवर धडक देऊन संबंधित शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, तरीही शिक्षक पुन्हा शाळेत
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सप्टेंबर २०२४ मध्ये पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली होती. शिक्षक मोहिते याच्याविरोधात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १ जुलै २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गंभीर आरोपांनंतरही मोहिते याला पुन्हा शाळेत घेतल्याने पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

पालक-प्रशासनाच्या बैठकीत ‘शाळेत न घेण्याचा’ निर्णय धुडकावला
सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या या गंभीर प्रकारानंतर पालक, ग्रामस्थ आणि शाळा प्रशासन यांच्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत मोहिते याला पुन्हा शाळेत न घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. मात्र, सोमवारी, १६ जून रोजी तो पुन्हा शाळेत हजर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालक अक्षरशः संतप्त झाले. “ज्याच्यावर विद्यार्थिनींसोबत गैरवर्तनाचे गंभीर आरोप आहेत, त्याला शाळेत पुन्हा कसा घेतले?” असा संतप्त सवाल पालकांनी शाळा प्रशासनाला विचारला. मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागानेच त्याला पाठीशी घातल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

गैरहजेरी असतानाही वेतन आणि ‘स्वहस्ताक्षरित’ पत्रामुळे पुनर्वेश?
सदर शिक्षकाने सप्टेंबर २०२४ नंतर शाळेला गैरहजेरी लावली होती, तरीही त्याचे नाव नियमितपणे मस्टरवर घेऊन त्याला वेतन देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १६ जून रोजी त्याने ‘स्वहस्ताक्षरित’ पत्राद्वारे हजर असल्याचे कळवले आणि त्यानंतर त्याला शाळेत पुन्हा प्रवेश दिला गेला, असे सांगण्यात आले.

पालकांचा शाळेला अल्टिमेटम, पोलिसांचा हस्तक्षेप
या प्रकारानंतर संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले की, “ज्याच्यावर पोक्सोखाली गुन्हा दाखल आहे, अशा शिक्षकाला तात्काळ शाळेबाहेर काढा. अन्यथा आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही.” यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी शाळेत दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 18-06-2025