दापोली : शहरातील काळकाईकोंड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या छताची वेळेत दुरुस्ती न झाल्यामुळे शाळेच्या पहिल्याचदिवशी सुमारे ६० विद्यार्थ्यांना अन्यत्र हलवण्याची नामुष्की शाळा प्रशासनावर आली. या शाळेचे छप्पर नादुरुस्त झाल्याने वर्गखोल्यांमध्ये बसणे धोकादायक झाले होते. शाळा प्रशासनाने वेळोवेळी शिक्षण विभागाशी लेखी पत्रव्यवहार करून छप्पर दुरुस्तीची मागणी केली होती; मात्र शिक्षण विभागाने या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष केल्याने अखेर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचे ठरवण्यात आले.
पर्यायी ठिकाण म्हणून परिसरातील बुरूड समाजाचे सभागृह वापरण्याचा प्रस्ताव पुढे आला. स्थानिक बुरूड समाज पदाधिकाऱ्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत सभागृह तात्पुरते शाळेसाठी उपलब्ध करून दिले आहे. यावावत पालक व नागरिकांनी बुरूड समाजाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. हे सभागृह मुख्य रस्त्यालगत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून, दापोली नगरपंचायतीचे काळकाई कोंड येथील सभागृह तात्पुरते शाळेसाठी देण्यात यावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित हलगर्जीपणा का झाला? आणि आता तरी शिक्षण विभागाला जाग येईल का? असा सवाल संतप्त पालक व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सध्याच्या अतिवृष्टीमुळे ही शाळा मुलांना बसवण्यासाठी धोकादायक झाली आहे. या शाळेचा दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव या अगोदर पाठवला आहे. सध्या मुलांची बसण्याची व्यवस्था तेथील शाळेचीच एक दुसरी इमारत आहे व येथील बुरूड समाजाच्या सभागृहामध्ये केली आहे. लवकरच पुन्हा एकदा या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवत आहोत- सुनील कारखेले, शिक्षण विस्तार अधिकारी, दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 18/Jun/2025














