संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. संगमेश्वर येथील शास्त्रीपुलाजवळ, दानिश चायनीज सेंटरसमोरील नवीन काँक्रिट रस्ता खचल्याने आणि मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने महामार्गाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता सरळ सरळ दोन भागांत विभागला गेला आहे, ज्यामुळे वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील कुरधुंडा येथे आधीच संरक्षण भिंतीला तडे गेल्याचे समोर आले असताना, आता शास्त्रीपुलाजवळील रस्त्याचे खचणे आणि त्याला मोठे तडे जाणे, ही अजून एक चिंताजनक बाब आहे. यामुळे प्रशासन आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले जात आहे.
रस्ता धोकादायक असल्याची माहिती असूनही ठेकेदार कंपनीने कोणतेही बॅरिकेट्स वा सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे अवजड वाहनेही बेधडकपणे धोकादायक भागातून प्रवास करत आहेत. भविष्यात मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
प्रशासन, लोकप्रतिनिधी व ठेकेदार कंपनी यांनी त्वरित या प्रकरणाकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक आणि प्रवासी करत आहेत.
दरड कोसळून वाहतूक ठप्प
सोमवारी संध्याकाळी उशिकरा शास्त्रीपुलाजवळ दरड कोसळून मोठे दगड आणि माती महामार्गावर आल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झालो. सुदैवाने, त्याचवेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दरड कोसळल्यानंतर वाहने तडे गेलेल्या रस्त्यावरूनच दोन्ही बाजूंना वळवण्यात आली. त्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणी दरड कोसळली
माखजन करजुवे मुख्य रहदारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्या असून, हा मार्ग अतिशय धोकादायक झाला आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. धामापूर, वेसवीवाडी, धनावडेवाडी आदी ठिकाणी बाजूच्या डोंगराचा भाग रस्त्यावर आल्यामुळे एसटीसह खासगी वाहनांना त्यातून मार्ग काढत पुढे जावे लागत आहे. या मार्गाच्या दुतर्फा नालेसफाई व खोदाई न झाल्यामुळे पडणारे पाणी थेट रस्त्यावरूनच वाहते.
आरवली ते करजुवे या मार्गाची कोणत्याही प्रकारे नालेसफाई व खोदाई बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी केली नसल्यामुळे सध्या ग्रामस्थांसह विद्यार्थी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. बांधकाम विभागाने तत्काळ या मार्गाची दुरुस्ती करून हा मार्ग सुलभ करावा; अन्यथा शिवसेना स्टाईलने अधिकारीवर्गाला जाब विचारू- बाबू मोरे, शिवसेना शाखाप्रमुख, मावळंगे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 18/Jun/2025














