चिपळुणात भाताची ५६९ हेक्टरवर रोपवाटिका

चिपळूण : तालुक्यात यावर्षी ७ हजार ९२ हेक्टरवर भात आणि ७०० हेक्टरवर नाचणी लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पावसाचे लवकर आगमन आणि त्यानंतर पडलेला खंड यामुळे पेरणीच्या कामांवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सद्यःस्थितीत ५६९ हेक्टरवर भाताची रोपवाटिका (नर्सरी) तयार झाली असून, ४२.७० हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

तालुक्याचे मुख्य पीक भात तर दुय्यम पीक नागली असून, बहुतांश ठिकाणी रोपे काढून लागवड पद्धत अवलंबली जाते. मॉन्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी करणे अशक्य व धोकादायक होते. त्यामुळे पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामाला प्रारंभ केला. मृग नक्षत्र सुरू झाले असून, सलग पाऊस नसला तरी बऱ्यापैकी उघडझाप सुरू आहे.

त्यामुळे जमिनीतील ओलावा पाहून शेतकरी भात, नाचणीची पेरणी करत आहेत. पुढील आठवड्यामध्ये पावसामध्ये सातत्य आल्यास रोपवाटिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे तसेच भाताचे क्षेत्रविस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत ९३ क्विंटल रत्नागिरी ८ भातबियाणे वाटप केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 18/Jun/2025