महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषादेखील पहिलीपासून सक्तीची करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
या टीकेनंतर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे स्पष्ट केले होते. त्यातच आज राज्य सरकारने नवीन जीआर काढला असून त्यात केवळ ‘अनिवार्य’ शब्द वगळला असून, 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार, असं नमूद केलेले आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वीसाठी हिंदी तृतीय भाषा असल्याचा उल्लेख शासन निर्णयात केला गेला आहे. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र दिलं आहे. या पत्रकात त्यांनी मुलांना तिसरी भाषा शिकायची नाही तर मग पुस्तक छपाई का सुरु आहे, असा सवाल सरकारला केला आहे.
एप्रिल महिन्यापासून शिक्षण विभागाचा महाराष्ट्रात नुसता गोंधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळेत इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला. ज्याला मनसेने कडाडून विरोध केला. पुढे त्यावर जनमत तयार झालं. त्यानंतर जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि हिंदीची सक्ती नसेल. पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रमात उपलब्ध करुन दिला जाईल.
हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही, कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतील काही प्रांतामध्ये बोलली जाणारी भाषा आहे म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. ती ज्या भागात बोलली जाते तिथे अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्या आहेत आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोली भाषा काळाच्या ओघात नष्ट होतील, अर्थात आता आपली स्थानिक बोली भाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा आहे. आपल्याला त्याच्याशी काही घेणेदेणं नाही. पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल, तेव्हा आम्ही आवाज उठवला आणि यापुढेही उठवत जाऊ.
पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून महाराष्ट्रात दोनच भाषा शिकवल्या जातील. याचा लेखी आदेश कुठे आहे का, आला असेल तर तो आम्हाला दिसला नाही. कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेले सरकार हा कागद पण नाचून दाखवेल. मग आमचा प्रश्न आहे की मुलांना तिसरी भाषा शिकायची नाही तर मग पुस्तक छपाई का सुरु आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निर्दशनास आले आहे की पुस्तक छपाई सुरु आहे याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय याला तुम्ही शाळांनी सहकार्य करु नका. मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडला पाहिजे. यात मुलांचे नुकसान आहे. पण त्यासोबतच मराठी भाषेचे सर्वात जास्त नुकसान आहे, असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 18-06-2025














