खेड : चिंचघरमध्ये मानवी वस्तीत आढळली चार फूट लांबीची मगर

खेड : सततच्या मुसळधार पावसामुळे नद्या व नाले तुडुंब भरून वाहत असून, त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत असल्याच्या घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथील मानवी वस्तीत मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल चार फूट लांबीची भलीमोठी मगर आढळून आली. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिला सुरक्षितरीत्या पकडण्यात यश आले.

ग्रामस्थांना ही मगर वस्तीमध्ये फिरताना दिसली व त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाची रेस्क्यू टीम काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे सदस्य सूरज जाधव, सर्वेश पवार, श्वेत चोगले व रोहन खेडेकर यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने या मगरीला पकडले. पकडलेली मगर वैद्यकीय तपासणी करून पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आली. ही संपूर्ण मोहीम रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धाडसी व यशस्वी रेस्क्यूमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून, वन विभाग व छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 18-06-2025