अभिजात भाषेचा दर्जा टिकवणे ही समाजाची जबाबदारी : संपदा जोगळेकर-कुळकर्णी

राजापूर : मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. त्यासाठी उत्तम वाचक बनले पाहिजे. पुस्तक वाचलं तरच मराठी टिकेल, असे प्रतिपादन लेखिका संपदा जोगळेकर- कुळकर्णी यांनी येथे केले. यावेळी कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार डॉ. अभय अळवणी यांना देण्यात आला. तसेच १० वी परीक्षेत मराठी आणि विज्ञान विषयात प्रथम क्रमांक मिळविलेल्या मानसी झिंबरे, श्रेया सावंत, श्रुती बोरवकर, स्वानंदी कातकर, ईश्वरी मांडवे यांचाही गौरव केला गेला. राजापूर येथील नगर वाचनालयाच्यावतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने आयोजित उत्तम वाचक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या म्हणाल्या, नवीन पिढी वाचनाकडे पर्यायाने वाचनालयांकडे वळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांची वाचनाची समज, आवड आणि त्यांना कोणत्या साधनाद्वारे ते सहज उपलब्ध होईल याकडे लक्ष पुरविले पाहिजे. त्याचबरोबर वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत कसे पोहोचेल या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव पाहता, मराठी टिकवून ठेवण्यासाठी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा उत्तम मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे त्यांनी विविध उदाहरणांतून सांगितले. नगर वाचनालय राबवित असलेल्या उपक्रमांविषयी त्यांनी गौरवोद्‌गार काढले.

राहुल कुळकर्णी यांनीही आपल्या छोटेखानी मनोगतात ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण ‘वाचाल तर आनंदाने जगाल’ अशा अर्थाने रूढ केली पाहिजे, म्हणजे केवळ अर्थार्जनासाठी वाचन नाही, तर आनंदासाठी वाचले पाहिजे, हे ठसवायला हवे. प्रारंभी कवी प्रमोद जोशी यांनी कविता सादर करून दाद मिळविली.

प्रास्ताविकात जयंत अभ्यंकर यांनी वाचनालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तर प्रभात पाध्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जास्तीत जास्त वाचकांपर्यंत अभिजात मराठी साहित्य पोहोचविण्यासाठी वाचनालयाचे संगणकीकरण करताना अधिकाधिक वाचक सभासद वाचक चळवळीशी जोडण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:03 PM 14/Oct/2024