चिपळूण : दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या प्रवाहाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्याच अनुषंगाने वाशिष्ठीतील गाळ उपशासह नलावडे बंधारा उभारण्यात आला. अवघ्या सहा महिन्यात हे काम पूर्णत्वास गेले आहे. सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊनही नलावडे बंधाऱ्यामुळे वाशिष्ठीचे पाणी शहरात शिरले नाही. त्यामुळे पुरसदृश्यस्थिती रोखण्यात नलावडे बंधाऱ्याची उपाययोजना यशस्वी ठरली आहे.
वाशिष्ठी व शिवनदीच्या काठावर चिपळूण शहर वसले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीवेळी दरवर्षी महापूर किंवा पूरसदृश स्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सलग दोन वर्षे गाळ उपसा सुरू आहे. त्याशिवाय शहरात पूररेषेच्या आत बांधकामांवर नियंत्रित आणले आहे. त्यानंतर आता पुराची तीव्रता कमी करण्यासाठी नलावडे बंधारा उभारण्यात आला आहे.
शहरामध्ये शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडे बंधारा) जुने दगडी बांधकाम केले होते. परंतु, २००५ च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून दरवर्षीच वित्तहानी होत होती. २०२१ च्या महापुरातही या भागासह शहराला मोठा फटका बसला. यामुळे या ठिकाणी पूर संरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर या संरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार 300 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
चिपळुणातील प्रीमियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट या कंपनीमार्फत है काम अवघ्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात आले. गेले दोन दिवस येथे सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वाशिष्ठीने जवळपास इशारा पातळी गाठूनही नलावडे बंधाऱ्यामुळे शहरातील शंकरवाडी व मुरादपूर परिसरात पाणी भरले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 18/Jun/2025














