रत्नागिरीत मटका जुगारावर पोलिसांची धाड: ७७५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त!

रत्नागिरी शहर, १७ जून २०२५ : रत्नागिरी शहरात पोलिसांनी कल्याण मटका जुगारावर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गाडीतळ ते गोखलेनाका जाणाऱ्या रस्त्यावर, सहकार सदर लॉजसमोरील एका बंद टपरीच्या आडोशाला करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष अशोक भालेकर (बक्कल नंबर १११२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नरेंद्र गणपत सावंत (वय ५८, रा. घर नं. ६६७, फणसोप, भिमनगर, ता.जि. रत्नागिरी) याला जुगार खेळवताना रंगेहाथ पकडण्यात आले.

आरोपी नरेंद्र सावंत हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळवत होता. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ७७५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ७७३० रुपये रोख रक्कम, २० रुपयांचा एक स्टीलचा स्टेपलर, ५ रुपयांची एक कचकाड्याची पट्टी, २ रुपयांचा एक निळ्या शाईचा बॉलपेन आणि एक कोऱ्या पानांचे स्टेपलर पिना मारून तयार केलेले पावती पुस्तक याचा समावेश आहे. या पावती पुस्तकावर कार्बन पेपरने “१७/०६/२५ k” असे लिहिलेले असून, त्याखाली कल्याण मटका जुगाराचे आकडे आणि त्यासमोर पैसे लिहिलेले आहेत. त्याचे वरील पान फाडलेले होते.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४९/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 18-06-2025